मा.चेअरमन यांचे मनोगत.....
डॉ. रवींद्र भोसले
सन्माननीय सभासद बंधू-भगिनी,
सप्रेम नमस्कार,

              दि. २६-०८-२०१६ रोजी होणाऱ्या २७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाच्या वतीने आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. १६ ऑक्टोबर २०१३ रोजी चोवीस वर्ष पूर्ण करून धन्वंतरी पतसंस्थेने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असल्याचे आपणास विदित आहेच. गेली २६ वर्षे आपणा सर्वांच्या सहकार्याने व सहकार कायद्यातील चौकटीत राहून संचालक मंडळाने यशस्वीपणे काम केले आहे. हे कामकाज करत असताना आजी व माजी सर्व संचालक, पदाधिकारी, सेवक वर्ग, सभासद, ठेवीदार, कर्जदार, जामीनदार, सहकार क्षेत्रातील सर्व शासकीय पदाधिकारी, सर्व बँका, कायदेविषयक सल्लागार व मुल्यांकनकार इ. संस्थेवर प्रेम करणारे हितचिंतक यांचे अमुल्य सहकार्य मिळाले. त्यामुळेच आम्ही धन्वंतरी पतसंस्था राज्यातील एक आदर्श पतसंस्था म्हणून नावारूपास आणू शकलो. धन्वंतरी पतसंस्थेवरील आपला प्रचंड विश्वास संस्थेला सर्वोच्च स्थानावर घेऊन गेला हे प्रामाणिकपणे कबूल करू इच्छितो. गेली २६ वर्ष पतसंस्थेत काम करीत असताना संचालक मंडळाच्या धोरणात्मक निर्णयाला महत्त्व जाते, तर सेवक वर्गानी आपल्या कामातील तत्परता, विनयशीलता, व चिकाटीची साथ दिली म्हणूनच आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे, पारदर्शक व प्रभावीपणे काम करू शकलो हे विनम्रपणे कबूल करतो.

              या सहकारी वर्षात सहकार कायद्यामध्ये ९७व्या घटना दुरुस्तीमुळे अमुलाग्र बदल झाले आहेत याची माहिती आपणास पत्ररूपाने कळवली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे सभासदांना फक्त शेअर्स घेऊन सभासद राहता येणार नाही तर सभासदांनी संस्थेशी दैनंदिन व्यवहार करून संस्थेने उपलब्ध केलेल्या सेवांचा फायदा घेतला पाहिजे, संस्थेमध्ये ठेवी ठेवल्या पाहिजे, संस्थेकडून कर्ज घेतलेले असले पाहिजे, संस्थेच्या कामकाजाच्या लक्षात आलेल्या उणीवा संचालक मंडळाच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत म्हणजेच आपण संस्थेचे क्रियाशील सभासद म्हणून संस्थेच्या कामकाजात सहभागी झाले पाहिजे. याशिवाय इतरही अनेक नियमात बदल झाले आहेत त्याची माहिती आपण घ्यावी. या बदललेल्या आदर्श उपविधीची प्रतमुख्य कार्यालयात उपलब्ध करून ठेवली आहे.

              संस्थेच्या धनकवडी शाखेचे स्थलांतर स्वमालकीच्या जागेत अद्ययावत फर्निचरसह यावर्षी केलेले आहे. आता संस्थेच्या सहा शाखा व मुख्यालय स्वमालकीच्या जागेत कार्यरत झालेले आहेत याचा अभिमान वाटतो. रौप्य महोत्सवी वर्षात धन्वंतरी हॉल व सातारा शाखेचे बांधकाम पूर्ण होत आहे. सातारा शाखा प्रशस्त जागेत अद्ययावत फर्निचरसह, नवीन लॉकरच्या उपलब्धतेसह स्थलांतरित करीत आहोत याचाही सर्वांनी फायदा घ्यावा हि विनंती.

              या वर्षात वसुलीबाबत सुद्धा थकबाकीदारापर्यंत संचालक मंडळ स्वतः वसुली विभागातील अधिकारी कर्मचाऱ्याबरोबर सहभागी होऊन ९८.२२% इतकी वसुली करण्यात यशस्वी झाले याबद्दल सर्व थक कर्जदार व जामीनदारांचे आभार व वसुली अधिकाऱ्यांचे अभिनंदन.

              रौप्य महोत्सवी वर्षाची सुरुवात १६ ऑक्टोबर २०१३ रोजी संस्थेचे “बीज जिथे रोविले” त्या जागेमध्ये पूजन करून धन्वंतरी मशाल पेटवून जिथे संस्थेचा वटवृक्ष वाढला त्या जागेत आणण्यात आली. त्यानंतर सहकार चळवळीवरील विश्वास दृढ व्हावा, लोकांचा सहकार विषयक दृष्टिकोन निकोप व्हावा म्हणून मुख्य कार्यालयातून सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आजी माजी संचालक, सेवक, बहुसंख्य सभासद यांच्यासह ढोल लेझीम पथकासह वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यांनतर पहिले सभासद, कर्जदार, ठेवीदार, सेवक यांचा त्यांच्या योगदानाबद्दल प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा. यशवंतराव पाटणे, डॉ. रवींद्र हर्षे, समर्थ एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. अरविंद गवळी आणि ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक श्री. रामभाऊ फडतरे इ. मान्यवर उपस्थित होते.

              रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर अनेक सांस्कृतिक कायक्रम, विविध स्पर्धा, स्नेह मेळावे घेण्यात आले त्यात आपण उपस्थित व सहभागी झालात त्याबद्दल मनःपूर्वक आभार. या पुढेही घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाना व प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्मरणिकेस आपण उपस्थित राहावे हि विनंती.

              अहवाल वर्षात अनेक सभासदांनी व त्यांच्या पाल्यांनी विविध क्षेत्रात उत्तम यश मिळवले त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व शुभेच्छा. पतसंस्थेच्या कामकाजात, वाढीबाबत आपल्या काही योजना असतील तर त्या जरूर कळवाव्यात.संचालक मंडळ निश्चितच त्याचा विचार करेल.